Ad will apear here
Next
पिस्सू टॉप

सगळ्यात मोठं, उभं, उंचच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे ‘पिस्सू टॉप’. अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात. एक पिस्सू टॉप आणि दुसरा शेषनाग. पिस्सू टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सू टॉपने दिला... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा बारावा भाग..
.....................................
मी उठून आजूबाजूला पाहू लागलो माझी बॅग दिसली नाही. समोर बघितलं.. डावीकडे..  उजवीकडे.. शेजारी असं सगळीकडे पाहिलं.. पण बॅग नव्हती. तेवढ्यात मागे वळून बघितलं आणि हुश्श..! बॅगवती डोक्याच्या मागे शांतपणे बसली होती. तिला मी उशाशी ठेवली होती आणि बाकी सगळं धुंडाळत होतो. हे म्हणजे माझं, ‘उशाशी बॅगळसा आणि तंबूला वळसा..!’ असंच झालं. माझ्या जीवात जीव आला. काही सेकंदांसाठी छातीत श्वास अडकला होता. ‘आय रिअली हॅड हार्ट इन माय माउथ..!’ असं काहीतरी. 

मनगटावरील घड्याळ आपल्या दोन काट्यांनी  सात वाजून पंधरा मिनिटे झाल्याचे दाखवत होते. उशीर झाला होता. साडेसातला निघायचं मी ठरवलं होतं. मला उठल्यापासूनच बरं वाटत नव्हतं. डोकं, शरीर जड झालं होतं. खूप अस्वस्थ वाटत होतं. सगळ्यात त्रासदायक म्हणजे घसा खूप दुखत होता आणि अजून तर यात्रा सुरूही झाली नव्हती. थंडी खूप होती. मी बाहेर जाऊन पहिले फ्रेश झालो. पाण्याची व्यवस्था छान होती. खूप सारे पोर्टेबल टॉयलेट्स होते. मला तेव्हा दिसलं की माझ्या तंबूच्या मागेच शौचालयाची ओळीने चाळ आहे. किती ती काळजी माझ्या पोटाची तंबुवाल्याला, देवाला बरे! सगळे लोक चंदनवाडीला जाणाऱ्या मार्गाने निघाले होते. मला उशीर झाला होता. याची किंमत नंतर चुकवावी लागेल याची कल्पना नव्हती तेव्हा मला.

मी मुखमार्जन आटोपलं, ‘दशमद्वारमार्जन’ मात्र केलं नाही. सिस्टम एकंदरीतच बिघडलं होतं. पण मला सगळ्यात जास्त काळजी होती ती घशाची. कारण मी काहीच खाऊ किंवा गिळू शकत नव्हतो. तंबूत परत येऊन मी आधी घरून आणलेला आलेपाक चांगला तीन चमचे खाल्ला. त्याने अंगात आतून गर्मी आली. बॅग उचलून निघालो. आदल्या दिवशी जिथे लॉकर रूममध्ये मोठी सॅक ठेवली होती तिथूनच जायचं होतं. लाऊडस्पीकरवरून सतत सूचना सुरू होत्या. रस्त्यात फुलांनी डवरलेली गुलाबाची खूप झाडं होती. जवळील मेडिकल सर्टिफिकेट आणि अमरनाथ श्राइन बोर्डाकडून मिळालेला परवाना, जो मिळवायला मला काय काय ‘जुगाड’ करावा लागला. तो असा सार्वजनिक मी नाही करू शकत. तो परवाना चेकिंग पोस्टवर दाखवावा लागला आणि तिथून बाहेर पडलो. पहलगामचं तंबूस्तान मागे राहिलं. ‘बचेंगे तो फिर मिलेंगे’ असं मनात म्हणून मी समोर चालू लागलो. 

लीडर नदी, जम्मू - काश्मीरथोड्याच वेळात लिडर नदीकाठी असलेल्या डांबरी रोडवर आलो. तिथून प्रत्येकी शंभर रुपये घेऊन चंदनवाडीपर्यंत काश्मिरी लोकांच्या गाड्या सोडत होत्या. खरी चालण्याची  यात्रा चंदनवाडीपासूनच सूरु होते. सर्वजण समूहाने आले असल्याने त्यांना प्रथम प्राधान्य मिळत होतं. मी एकटा असल्याने मला ‘सिंगल’ सीटसाठी खूप अडचण येऊ लागली. अर्धा तास गेला पण एकाही गाडीत मला सिंगल सीट मिळाली नाही. वेळ भराभर जात होता. साडेनऊ वाजत होते. तेवढ्यात एक गंमत झाली. काही संन्यासी साधू होते, ज्यांना त्यातून जायचं होतं. परंतु त्यांच्याजवळ पैसे नव्हते म्हणून त्यांना गाडीत घेत नव्हते. त्यामुळे ते रस्त्यावर आडवे झोपले. रस्ता अडवून धरला. शेवटी पोलिसांनी मध्ये पडत  त्यांना उठवलं आणि एक गाडीवाल्याने त्यांना नेण्याचे कबूल केले.  

अभिजित पानसेमीसुद्धा  रस्त्यावर आडवा झोपू का.. मला कोणी गाडीत घेत नाही म्हणून.. असा विचार केला! निषेध.. निषेध.. ओरडू का..? अरे कोणी जागा देता का रे जागा.. या तुफानाला. हे तुफान आता थकलंय. पोट बिघडलेल्या अवस्थेने गळलंय. आओ कुछ तुफानी करते है.. असंही क्षणभर वाटून गेलं, पण पोलीस पार्श्वभागावर लाठीप्रहार करतील ही जाणीव झाल्याने मी विचार सोडून दिला. 

तेवढ्यात एका चालकाने मला आवाज दिला. त्याच्या गाडीत एक जागा रिकामी होती. आमचा रथ चंदनवाडीकडे लीडर नदीच्या साक्षीने दौडू लागला. शब्द अपुरे पडतात असं अप्रतिम, सुंदर सृष्टीसौंदर्य दिसू लागलं. चंदनवाडीला जाताना उंचावर वळणावळणाच्या रस्त्याने जात होतो. खाली खळाळत लिडर, वर निळंशार आकाश, उंचच उंच हिमालय पर्वताची शिखरे, त्यावर घनदाट देवदारचं जंगल, असं सगळं दृश्य होतं. मध्ये पुन्हा एकदा तपासणी झाली. पाऊण तासात चंदनवाडीला पोहचलो. प्रचंड गर्दी. मी रांगेत उभा राहिलो. ती शेवटची आणि महत्त्वाची तपासणी रांग होती. चंदनवाडीलाही तंबू आणि लंगर दिसले. 
तेवढ्यात लाठी विकणारा एक छोटा मुलगा दिसला. दोन हातात दोन देवदारच्या जाड्या अशा लाठ्या मी विकत घेतल्या. तपासणी होऊन बाहेर आलो. आता शड्डू मांड ठोकण्याची वेळ आली होती. अभी तो पार्टी सुरू हुई थी..!

अमरनाथयात्रा का खास आणि वेगळी आहे याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. अनेक लोक हातात फ्रुटी, चॉकलेट्स, टॉफिज, बिस्किटांची पाकिटं आणून देत होते. कोणी अॅपल ज्यूसची बाटली आणून दिली. लंगरमध्ये गरम जेवण, न्याहारी सगळं मिळत होतं. एक ठिकाणी मला ‘बनारसी पान’चाही लंगर दिसला. चहा, कॉफी, सरबतं सगळ्यांची सरबराई होती. आपण फक्त तिथे जाऊन हवं ते घ्यायचं. हे सर्व देताना वागण्यात कसलाही कोरडेपणा किंवा तुसडेपणा दिसत नव्हता. उलट अत्यंत आर्जवतेने ते बोलावत होते. खाण्याचे आवाहन करत होते.  

कलियुगातील कर्ण अमरनाथ यात्रेत दिसत होते. मी त्या सगळयांना मनोमन नमस्कार केला आणि पूढे चालू लागलो. सगळ्यात मोठं, उभं, उंचच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे ‘पिस्सू टॉप’. अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात. एक पिस्सू टॉप आणि दुसरा शेषनाग. पिस्सू टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सू टॉपने दिला.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUMBK
Similar Posts
‘आवो भोले.. पिस्सू टॉपतक घोडा कर लो..!’ आजूबाजूला शुभ्र बर्फ होता, पण चालायच्या वाटेवरचा बर्फ माती, चिखल आणि धुळीनी काळवंडला होता. बर्फातही मळलेली वाट असते. दोन्ही बाजूंना असलेले उभे, उंच पर्वत धीर खचवत होते. खळाळती नदी उत्साह वाढवत होती. माझी पिस्सू टॉपची कठीण चढाई सुरू झाली होती... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या
आत्मीयतेने मोफत जेवू घालणारे लंगरवाले... इतक्या उंचावर जिथे सर्व महाग मिळतं, तिथे हे लंगरवाले यात्रेकरूंना मोफत चविष्ट अन्न खाऊ घालतात. आश्चर्य म्हणजे अन्न वाढताना कसलाही अहंकार नाही, का कटू, कोरडा व्यवहार नाही. अत्यंत प्रेमाने, आर्जवतेने ते यात्रेकरूंना आपल्या लंगरमध्ये बोलावत असतात. जणू त्यांच्यातच एक सशक्त स्पर्धा असते, कोण जास्त यात्रेकरूंना खाऊ घालेल, कोणाचं अन्न जास्त रुचकर
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language